राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १७ पथकं राज्यात तैनात
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून तो या आठवड्याच्या अखेरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आज सकाळपासून पावसानं सर्वत्र हजेरी लावली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीशी मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १७ पथकं राज्यात तैनात केली आहेत. एनडीआरएफचे पुण्याचे मुख्याधिकारी अनुपम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. आज सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू असली तरी कालच्या पेक्षा आज पावसाचा जोर कमी आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत आहे. रस्ते वाहतूकही सुरू आहे.
गेल्या चोवीस तासात शहरात १०७ मिलिमीटर, पूर्व उपनगरात १७२ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात १५२ मिलिमीटर पाऊस पडला. आजही मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली असून मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत असल्याच्या पार्श्वभूमीवर पावसानं आज, सकाळपासून विश्रांती घेतली आहे. काल रात्री आठ नंतर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची पातळी ३० झाली आहे. २३ बंधारे पाण्याखाली गेले असून रात्री उशिरा पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर वाहात आहे. राधानगरी धरण ३४ टक्के भरलं असून त्यातून ११०० क्यूसेक्सनं विसर्ग सुरू आहे. वारणा धरणात तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली असून राधानगरी, तुळशी आणि दूधगंगा धरणातला पाणीसाठाही वाढला आहे. दरम्यान एनडीआरएफ च्या जवानांनी आज सकाळी पंचगंगेच्या महापुराची पाहणी केली.
नांदेड जिल्ह्याच्या ऊमरी तालुक्यातील धानोरा महसुल मंडळात आज अतिवृष्टी झाली आहे. या ठिकाणी ७३ पूर्णांक ७५ शतांश मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आज पर्यत २३१ पूर्णांक ६० शतांश मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पेरणीच्या कामाला गती मिळाली असून आतापर्यंत ६५ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाली आहे. पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली असून खबरदारी म्हणून एनडीआरएफचं एक पथक पालघर जिल्ह्यात दाखल झालं आहे. पालघर जिल्ह्यातल्या मनोर मध्ये ही एनडीआरएफचं पथक पोचलं असून ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या संपर्कात आहे. या पथका मध्ये २५ जवान, २ अधिकारी आणि ८ बोटींचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु होता. आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी जिल्ह्यातल्या अनेक भागांत तो मध्यम स्वरुपात पडत आहे. पावसामुळे पालघर जिल्ह्यातला साखरे डॅम ओव्हर फ्लो झालायं. जिल्ह्यात एकूण ६२६ पूर्णांक ४५ शतांश मि.मी इतका पाऊस झाला आहे.