स्कूल बसेस, व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवार व रविवारीही कामकाज
Ekach Dheya
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
शैक्षणीक वर्ष 2022-23 नुकतेच सुरु झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षीत वाहतूक होण्याच्या दृष्टीने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध असणे अनिवार्य आहे. याकरिता शाळा प्रशासन, स्कूल बस चालक- मालक यांना त्यांच्या स्कूल बसेस, व्हॅन यांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घेणे सोयीचे व्हावे याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शनिवार व रविवार या शासकीय सुट्यांच्या दिवशी दिवे येथील ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज सुरु ठेवण्यात येणार आहे.
सुट्यांच्या दिवशी स्कूल बस, व्हॅन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता सादर करण्यापूर्वी मुख्यालयाच्या परिवहन विभागातून पूर्वनियोजित वेळ घेणे आवश्यक आहे. पूर्वनियोजित वेळ न घेता थेट दिवे येथे वाहने सादर केल्यास अशी वाहने स्वीकारली जाणार नाहीत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे मार्फत स्कूल बस योग्यता प्रमाणपत्र तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त वाहनांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.