मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ekach Dheya
मुंबई : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. त्यामुळे या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. तसेच दृकश्राव्य प्रणालीद्वारे जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात यावा. या प्रकल्पाला शासनस्तरावरून आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.