विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. समाजसेवक वीरेंद्र हेगडे, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु, संगीतकार इलायाराजा, धावपटू पी.टी. उषा हे राज्यसभेसाठी नामनिर्देशित झालेले उमेदवार आहेत. आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीसाठी वीरेंद्र हेगडे करत असलेल्या महान कार्याचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली आहे. ते संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं. व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगताशी संबंधित आहेत.
त्यांच्या कलाकृतींनी भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडवलं असून जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. इलायाराजा यांनी सर्जनशील प्रतिभेनं पिढ्यानपिढ्या लोकांना मोहीत केलं आहे. ते भावना सुंदररित्या व्यक्त करतात. त्यांचा जीवन प्रवास, त्यांची जडणघडण विनयशील पार्श्वभूमीतून झालेली आहे आणि त्यांनी खूप काही साध्य केलं आहे. त्यांना राज्यसभेवर नामांकन मिळाल्याचा आनंद आहे, असं त्यांनी सांगितलं. पीटी उषा यांची कामगिरी सर्वश्रुत आहेच पण गेल्या अनेक वर्षांपासून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं त्यांचं कार्य तितकंच कौतुकास्पद आहे, असं त्यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.