तळेगाव : मावळचा निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय. मावळ तालुक्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी, आक्रमक रीतीने तालुक्याच्या विकासाचा एकच विचार ज्याच्या मनामध्ये आहे, त्या सुनिल शेळकेंना संधी द्या, पाठिंबा द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी तळेगाव येथे शरद पवारांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार यांनी यावेळी आपल्या मिश्किल शैलीत चौफेर फटकेबाजी केली. भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेतला. सुरुवातीलाच त्यांनी समोर उपस्थित विराट जनसमुदायाकडे पाहून ‘काय मामला काय आहे?’ असे मिश्किल शब्दात विचारले. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरतो आहे, पण तळेगावातली गर्दी पाहून माझा विश्वासच बसत नाही. तरुण आणि महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून आश्चर्य वाटले, अशा शब्दात त्यांनी या सभेचे वर्णन केले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मावळ तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापू भेगडे, मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील 16 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. तर केंद्र सरकारने 81 हजार कोटींची रक्कम सरकारी तिजोरीत भरली. धनदांडग्यांच्या कर्जाचे ओझे माफ केले पण शेतकर्यांसाठी काही केलं नाही. शेतकर्यांना न्याय देण्याचे काम राष्ट्रवादीने केले. शेतकर्यांची बिकट अवस्था या नाकर्त्या सरकारच्या लक्षात कशी येत नाही? असा संतप्त सवालही पवार यांनी यावेळी केला. भाजपाला शेतकरी आणि शेती यांच्याबाबत काहीही आस्था नाही त्यामुळे त्यांना दारात उभंही करु नका. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारं हे सरकार आहे, त्यांना मतं देऊ नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं. या सरकारच्या काळात जेट एयरवेज बंद पडल्यामुळे २० हजार लोकांचा रोजगार गेला. महिलांना, कष्टकर्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्याच जमिनीवर उभारलेल्या कारखान्यामध्ये नोकरी मिळत नाही. बेकारी घालवायची असेल तर उद्योग-धंदे वाढले पाहिजेत. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, त्यासाठी सुनिल शेळके यांच्यासारख्या तडफदार तरुणाला आमदार केले पाहिजे, असे पवार म्हणाले. तळेगावात शरद पवारांच्या सभेला झालेली अभूतपूर्व गर्दी ही मावळमधील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी ठरल्याची चर्चा सभास्थळी रंगली होती.
चौदाशे कोटींमध्ये 14 रस्ते तरी केले का? – शेळके