मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम असून उद्याही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातल्या सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्यानं संपर्कात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात पहाटेपासूनच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम होत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरच्या गाड्या विलंबानं धावत आहेत. शहर भागात आज सकाळपर्यंत ६१ पूर्णांक ९९ मिलिमीटर, पूर्व उपनगरात ४७ पूर्णांक ७२ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ४५ पूर्णांक ९७ मिलिमीटर इतका पाऊस पडला. पावसाची संततधार सुरूच आहे.
ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजता संपलेल्या २४ तासांत ७० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. भिवंडीमध्ये कामवारी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . उल्हास नदीची पातळी १६ मीटरनं वाढल्यामुळे बदलापूर शहरालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक सध्या थांबविण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. गेले तीन दिवस दमदार पावसानं हजेरी लावली असून आज दुपारी संपलेल्या २४ तासांत ७४ मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातल्या हमरापुर – गलतरे इथल्या आंब्याची मोरी पाण्याखाली गेल्यानं आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. नाणे, सांगे, गालतरे, गोरे, गुहिर, हमरापुर या गावांचा संपर्क तुटला आहे. आज सकाळपासून पालघर, बोईसर, डहाणू, वाढवण, वरोर, वसई – विरार सह जिल्ह्यातल्या अन्य भागांत जोरदार पाऊस सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत ७२ मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती नाही. पावसामुळे जिल्ह्यात ६५ घरांचं अंशतः तर ९ घरांचं पूर्ण नुकसान झालं.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नाही. मात्र जगबुडी नदी धोक्याच्या पातळी वरून वाहत असल्यामुळे नदी किनाऱ्यावरच्या गावातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यातल्या १२६ घरांचं अंशतः तर ६ घरांचं पूर्ण नुकसान झालं.
नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून शेतकऱ्यांनी तयार केलेली बहुतेक सर्व शेततळी पाण्यानं भरली आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं हतनूर धरणाच्या ४१ दरवाज्यांपैकी १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या २० हजार ३७७ क्युसेस पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. हतनुर धरणाची धोक्याची पातळी २१४ असून सध्या पाणी २०९ या पातळीवर पोहोचलं आहे. वाशिम जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात आज पहाटे पासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. मात्र काल पासून पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ७ हजार १२८, दारणा धरणातून ८ हजार ८४६ क्यूसेक विसर्ग सध्या सुरू आहे. निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ५८ हजार ६९७ क्यूसेक प्रवाह सध्या सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातला गोंदेखारी नाला भरून वाहू लागल्यामुळे घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. कालच्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहेत. तुमसर तालुक्यातल्या चांदपुर तलावाच्या प्रवाहाचं पाणी गोंदेखारी नाल्यात आल्यानं नाल्याला पूर आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गेले चार दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातल्या खडकपूर्णा,उतावळी,ज्ञानगंगा या प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मन.बेबळा,मस यासह अन्य नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या मौजे रेणापूर इथं अतिवृष्टीमुळे १५ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. तालुक्यातल्या नांदा बुद्रुक गावचा संपर्क तुटला आहे. – बिलोली तालुक्यातल्या बेटमोगरा शिवारात मन्याड नदीला पूर आला असून गावाला जोडणाऱ्या पुला वरून पाणी वाहत आहे. बेटमोगरा गावचा संपर्क तुटला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज बुधवारी सकाळी ८ : ०० वाजेपर्यंत मागील २४ तासात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, आतापर्यंत २४३.२ मि मी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. पुणे, सातारा आणि सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कुठेही पूरस्थिती नाही. तसंच सर्व नद्या धोक्याच्या पातळी खाली वाहत असून वाहतूक सुरळीत सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व नद्या धोक्याच्या पातळी खाली वाहत असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात तेलंगणा राज्यातल्या श्रीपाद येलमपल्ली प्रकल्पातून तसंच मेडीगड्डा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातले चारही जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं शेकडो घरं पाण्याखाली गेली आहेत. कापूस, सोयाबीन, तूर, धान आणि भाजीपाल्यालाची लागवड केलेली शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. नद्यांना पूर आल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. प्रशासनानं शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. मुख्य सचिवांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सदैव संपर्कात राहण्याचे निर्देश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातल्या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज असून कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. एखादी दुर्घटना घडली तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा तत्काळ पोहचतील असं त्यांनी सांगितलं. आजवर स्थलांतरित केलेल्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.