पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे सलग दहा वर्षे समविचारी पक्षाचे आमदार होते. भोसरी मतदारसंघातील दादागिरी, दहशत, गुंडगिरी, खंडणीखोरी तसेच विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची सुरू असलेली लूट थांबविण्यासाठी लांडे यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी शनिवारी केली.
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत संयुक्त चर्चा केली. भोसरीतील चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालून जनतेला भयमुक्त वातावरण तयार करायचे आहे. जनतेला दादागिरीतून मुक्तता मिळवून द्यायची आहे. त्यासाठीच आपला हा लढा असल्याचे माजी आमदार लांडे यांनी कांग्रेस शहराध्यक्षांना सांगितले. मतदारसंघातील जनतेनेच विधानसभेची निवडणूक आपल्या ताब्यात घेतली आहे. प्रचारा दरम्यान मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.
अशा परिस्थितीत शहर काँग्रेसने धर्मांध शक्तींना तसेच जाती-धर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मला पाठिंबा द्यावा, अशी विनंती लांडे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांना केली. सचिन साठे यांनीही लांडे यांच्या मागणीला मान देत पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे संग्राम तावडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, नितीन सस्ते, सुंदर रोकडे आदी उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना सचिन साठे म्हणाले, “भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे दहा वर्षे समविचारी पक्षाचे आमदार होते. भोसरी मतदारसंघाचे शहरीकरण करण्यामध्ये लांडे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मतदारसंघात त्यांनी केलेले काम कोणीही विसरू शकणार नाही. यंदाची विधानसभा निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे. लोकांना विकासाच्या भुलथापा मारून भोसरी मतदारसंघाला भकास करणाऱ्या प्रवृत्तींना यंदा रोखणे आवश्यक आहे. या मतदारसंघात फिरल्यानंतर लोकांना कसे दहशतीखाली दाबण्याचा प्रयत्न होतोय, हे दिसते. त्यामुळे अशा दुष्ट प्रवृत्तींना आणि धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील उपक्ष उमेदवार विलास लांडे यांना शहर काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील जनता आपल्यावर आलेले दहशतीचे संकट कायमचे घालविण्यासाठी या निवडणुकीत कपबशी चिन्हावर मतदान करून लांडे यांना भरघोस मतांनी निवडून देतील. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता विलास लांडे यांच्या विजयासाठी झटेल, असे साठे यांनी सांगितले.”
Attachments area