Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सरस आजीविका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचतगटांचे १० स्टॉल

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने येथील इंडिया गेटवरील राजपथ लॉनवर आयोजित सरस आजीविका मेळाव्यात राज्याची हस्तकला व खाद्यसंस्कृती दर्शविणारे महिला बचतगटांचे 10 स्टॉल सहभागी झाले आहेत.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘दिनदयाल उपाध्याय अंत्योदय-राष्ट्रीय आजीविका योजनेंतर्गत’ येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर सरस आजीविका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देशातील 29 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 500 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील 10 महिला बचत गटांनी यात सहभाग घेतला आहे.

राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण  मसाले, पापड, लोणचे आदी जिन्नस या मेळाव्यात विक्रीसाठी असून राज्यातील 4 महिला बचत गटांचे स्टॉल  येथे लावण्यात आले आहेत. राज्यातील हस्तकलेची ओळख करून देणारे 4 आणि खाद्यसंस्कृती दर्शविणारे 2 असे एकूण 10 बचत गटांचे स्टॉल्स  या ठिकाणी आहेत.

10 ते 23 ऑक्टोबर 2019 पर्यंत चालणाऱ्या  सरस आजीविका मेळाव्याचे  शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version