महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बाधित
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं.
सभागृहात नियमबाह्य वर्तन केल्याबद्दल आपचे खासदार संजय सिंग यांना आज निलंबित करण्यात आलं. संजय सिंग यांनी काल सभागृहात कागद फाडून पीठासनाकडे फेकल्याबद्दल त्यांना या आठवड्याच्या ऊर्वरित भागासाठी निलंबित करावं, असा प्रस्ताव संसदीय कामकाजमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. त्यानंतर कामकाज तहकूब झालं.
पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा उपाध्यक्ष हरिवंश यांनी वारंवार सांगूनही निलंबित खासदार संजय सिंग यांनी सभागृहातून बाहेर जायला नकार दिला त्यामुळे उपाध्यक्षांनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं.
त्याआधी सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताचं काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी इतर मुद्यांवर दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला. त्यामुळे सदस्यांनी सभागृहाच्या मधोमध येऊन घोषणाबाजी सुरु केली. गोंधळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी कामकाज एका तासासाठी स्थगित केलं होतं.
लोकसभेतही कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जी एस टी आणि अन्य मुद्द्यांवरून सदनात घोषणाबाजी सुरु केली, त्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.