Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निवडणूक पैशाने नाही तर निष्ठेने जिंकावी लागते

मावळ : जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजुला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या रूपाने पक्षनिष्ठा आणि विकासालाच जनता मत देणार असे मत जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी प्रचारादरम्यान झालेल्या सभेत व्यक्त केले.
वराळे येथे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नागरिकांकडून रविवारी जोरदार स्वागत झाले. रविवारी सर्व प्रचार दौरे रद्द असूनही गावाने केलेल्या आग्रहास्तव भेगडे यांनी स्वतःची कामे बाजुला ठेऊन नागरिकांच्या विनंतीला मान देत त्यांना प्राधान्य दिल्याने नागरिकांनी भेगडे यांचे तोंडभरून कौतुक केले. स्वागतादरम्यान लहान मुलांसह तरुणांनी हातात झेंडे घेऊन ‘कहो दिलसे बाळाभाऊ फिरसे’ अशा घोषणा दिल्या.
राज्यमंत्र्यांनी राबविलेल्या महायज्ञ आरोग्य शिबिराचा मावळ तालुक्यातील ६० ते ७० हजार नागरिकांना फायदा झाल्यामुळे आज नागरिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम झालेला आहे असे मत मावळ तालुका भाजपा प्रभारीचे भास्करआप्पा म्हाळसकर यांनी व्यक्त केले.
गावामध्ये रस्त्यांची कामे, विजेची कामे सरकारने राबविलेल्या घरकुल योजना, विमा योजना आणि बांधकाम मजूर योजना यांचा गावातील खूप लोकांना फायदा झाला आहे. तसेच स्त्रियांसाठी शेळीपालन, पीठगिरण, शिलाई मशीन अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वबळावर उभे राहण्यास मदत केली. गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गोठ्याची सोय होण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असे मत सरपंच मनीषा निलेश शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन बाळा भेगडे यांचा सन्मान केला व गावासाठी दिलेल्या सुखसोयींबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी गावातील तरुण तरुणींना राज्यमंत्री समवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. विकासाचा दृष्टिकोन आणि राजकीय प्रलगभता असलेले सर्वसमावेशक नेतृत्व बाळा भेगडे असल्याने आमचे मत त्यांना असा निर्धार यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी केला.
Exit mobile version