संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे उमटले. त्यासह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊत यांच्या अटकेच्या मुद्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यावरही या मुद्द्यावरुन, तसंच चार खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ सुरु केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. दरम्यान, महागाईच्या मुद्यावर उद्या राज्यसभेत चर्चा केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सभागृहात सांगितलं.