स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शहरात ‘उत्सव ७५ ठाणे’ साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीत बाईकस्वार संदेश घेऊन मोठी यात्रा काढणार आहेत. ‘वाहन चालवताना बाळगण्याची सुरक्षितता’ असा विषय घेऊन हे चालक जनजागृती करणार आहेत.
वाशिम इथं येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या ६ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या शहरी भागात ५३ हजार १४८ ठिकाणी तसंच शहरातल्या खाजगी आस्थापनावर देखील तिरंगा ध्वज फडकणार आहे. वाशिम शहरासह मानोरा, मालेगाव शहरात अनेक इमारतीवर तिरंगा ध्वज फडकणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा जिल्हा परिषदेमार्फत ९ आणि १३ ऑगस्टला कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली आहे. या कार्यक्रमांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागातले अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित रहावं, असं आवाहन जाधव यांनी केलं आहे.