प्रधानमंत्र्यांनी केले मुष्टियुद्धा सागर अहलावत याचे अभिनंदन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सागर अहलावत याने मुष्टियुद्धात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. सागर अहलावत हा भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असून त्याचं यश मुष्टियुद्धामधे युवा पिढीला प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. बँडमिंटनच्या दुहेरी स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा देखील भारताला अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
क्रिकेटमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं देखील प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. बँडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्यांनी किदांबी श्रीकांतचं अभिनंदन केलं आहे. किदांबी श्रीकांत हा भारताच्या अव्वल बँडमिंटनपटूंपैकी एक असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं हे त्याचं चौथं पदक या खेळातलं त्याचं कौशल्य सिद्ध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टेबलटेनिस मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शरत कमल आणि श्रीजा अकुला या जोडीचं त्यांनी अभिनंदन केलं आहे. एकत्र खेळणं आणि जिंकणं याचा आनंद वेगळाच असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे.