नवी दिल्ली : टपाल खात्याने येत्या काळात टपाल बचत खात्याची संख्या 17 कोटींवरुन 25 कोटी करावी असे आवाहन केंद्रीय दूरसंवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केले आहे. सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही खाती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेशी जोडण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय टपाल सप्ताह कार्यक्रमानिमित्त ते आज नवी दिल्लीत बोलत होते. टपाल विमा खात्यांचाही विस्तार करावा असे ते म्हणाले. 130 कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ 3.05 कोटी विमा खाती ही संख्या फारच कमी असून टपाल खात्याने जागतिक कंपन्यांशी भागीदारी करण्यासाठी पुढे यावे प्रशासकीय मुद्दे असतील तर त्यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
पीओएसबी ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग ॲपचे उद्घाटनही त्यांनी केले. 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येतो.