नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना केले. पुढच्या प्रवासी भारतीय दिवसाला उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाला केले. कॉमोरसचा ‘ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रिसेंट’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने उपराष्ट्रपतींना गौरवण्यात आले. 1.3 अब्ज भारतीयांच्या वतीने नम्रतेने हा पुरस्कार आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
उभय देशांमध्ये संरक्षण, आरोग्य आणि औषधे, कला आणि संस्कृती, टेली एज्युकेशन यासह इतर क्षेत्रात सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारत आणि कॉमोरोस यांच्यात सागरी संरक्षण संबंध अधिक वृद्धिंगत करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. मोहोनी येथे उपराष्ट्रपतींनी संसदेला संबोधित केले.
भारत आणि सीयरा लिओन यांच्यात विविध क्षेत्रात सहा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.