‘आयओडी एमएसएमई समीट २०१९‘ चे उद्घाटन
मुंबई : देशाच्या आर्थिक विकासात उद्यमशीलतेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नवउद्योजकांचा आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण संकल्पना यामुळे देशाच्या आर्थिक विकास वाढीत भर पडेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास मंत्रालय, एसडीए बोकोनी- एशिया सेंटर यांच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी आयोजित केलेल्या पहिल्या ‘आयओडी एमएसएमई समीट २०१९’ या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता क्षेत्राशी निगडीत शिखर परिषदेचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकासाच्या दृष्टीने अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवउद्योजकांसाठी या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योजकांनाही ‘स्वयं.. मृगेंद्रता’ या उक्तीनुसार आत्मविश्वासाने प्रवेश करावा लागेल. त्यासाठी अलीकडच्या काळातील स्टार्ट-अपची उदाहरणेही प्रेरणादायी आहेत. प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटीच त्यांना या क्षेत्रात यश देऊ शकते, हे पुढे आले आहे. अशा नवउद्योजकांना वित्तीय पुरवठाही सुलभपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. उद्योग वाढीसाठी आवश्यक अशा विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नवउद्योजकांनी आता नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन या क्षेत्रात आत्मविश्वासानेच प्रवेश करावा, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन सत्रात एसडीए बोकोनी-एशिया सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक अलेसांड्रो गुईलियानी यांनी प्रास्ताविक केले. आयओडीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती यांनी परिषदेची संकल्पना स्पष्ट केली. एसडीए-बोकोनीचे अधिष्ठाता डेव्हीड बार्दोले, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक ए. आर. गोखे यांची भाषणे झाली. आयओडीचे पश्चिम विभागीय संचालक विकेश वालिया यांनी स्वागत केले आणि आभार मानले.
‘डीकोडींग एमएसएमई ग्रोथ ऑपर्च्युनिटीज’ या संकल्पनेवर आधारित या एक दिवसीय परिषदेत या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आदी मान्यवर पाच विविध सत्रात मांडणी करणार आहेत.