Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी – जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावार आज विधानपरिषदेत चर्चा झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली. विधानभवनात आमदारांनी सभागृहात प्रश्न मांडावेत पायऱ्यांवर बसून मांडू नयेत असं पाटील म्हणाले.

मात्र शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मात्र जयंत पाटील यांच्या मागणीला विरोध दर्शवला. काही प्रश्न सभागृहात वेळेअभावी सुटत नाहीत, त्यामुळे प्रत्येकाला पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असं अनिल परब म्हणाले. कोणताही द्वेष आणि तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, मात्र त्या ठिकाणी आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवावा, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. यावर बोलताना विधान कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहितेसंदर्भात जेष्ठ सदस्यांची बैठक बोलावण्याची तयारी दर्शवली. विधिमंडळात आमदारांचं वर्तन कशाप्रकारे असलं पाहिजे यासंदर्भात आचारसंहिता करण्याची गरज उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेत भाजपाच्या गटनेते पदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा उपसभापती गोऱ्हे यांनी केली.

Exit mobile version