शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्राधन यांनी काल सांगितलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते खेळाडू आणि फिटनेस तज्ञांशी संवाद साधत होते.
क्रमिक पुस्तकात खेळ आणि इतर युवासंबंधी विषय कसे समाविष्ट करता येतील याबाबत युवा आणि क्रीडा मंत्रालय माहिती गोळा करत आहे असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. मुष्टीयुद्धपटू निखत झरीन, टेबलटेनिसपटू भाविना पटेल, माजी कुस्तीगीर संग्रामसिंग असे अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.
फिट इंडीया शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या दुसऱ्या अंकाची घोषणा यावेळी करण्यात आली. येत्या ३ सप्टेंबर पासून शाळांना त्यात प्रवेश नोंदवता येईल. प्रवेश घेण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत आहे.