मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामं कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील शिक्षकांशी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यभरातल्या शिक्षकांच्या समस्या आणि सूचना त्यांनी ऐकून घेतल्या. राज्यातल्या सरकारी शाळांमधली पटसंख्या वाढवून त्यांना आदर्श शाळा करण्याचं आवाहन त्यांनी सर्व शिक्षकांना केलं. नव्या शैक्षणिक धोरणाची योग्यरितीने अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांशी संवादात वाशीम जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा साखरा येथील शिक्षक राजू महाले, बाकलीवाल शाळेचे शिक्षक अमोल काळे, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या प्राचार्य स्वाती कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना शिक्षण क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. तसंच प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावरही शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हितगुज साधले.