Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दिव्यांग मतदारांसाठी मदतीचा हात.. पीडब्ल्यूडी ॲप..

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. पुणे जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोयीचं व्हावं, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदारांसाठी ‘अक्सेसिबिलिटी ऑब्झर्व्हर’ डॉ. दिपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर या सुविधा देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत..

विधानसभा निवडणुक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दिव्यांग मतदारांची गृहभेटी देऊन नोंदणी करण्याबरोबरच त्यांना बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मॉल इ. सार्वजनिक ठिकाणी मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहेत.

या वर्षीच्या कार्यक्रमासाठी Accessible Elections “सुलभ निवडणुका” हा विषय (Theme) घोषित केला आहे. कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिक दृष्टया दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे काम या कार्यक्रमाव्दारे होत आहे. यासाठी आयोगाने PwD app ची निर्मिती केली आहे.

पीडब्लूडी ॲप (PwD app) –

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तिंचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरित्या मतदान करता यावे, यासाठी पीडब्लूडी ॲप (PwD app) तयार केले आहे. मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तिंना काही मदतीची आवश्यकता असल्यास त्यांना पीडब्लूडी ॲप (PwD app) मोबाईल वर डाऊन लोड करावा लागेल. या ॲपव्दारे मदतीचे स्वरुप व माहिती नोंदवता येते. तसेच 1950 किंवा 1800111950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येईल. दिव्यांगांची मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हिल चेअरची मागणी आदि सोयींसाठी निवडणूक आयोगाने पीडब्लूडी ॲप (PwD app)) उपलब्ध करुन दिला आहे. इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँन्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये हे ॲप डाऊनलोड करता येते. या ॲपची नोंद करणा-या नागरिकाला त्यांच्या मोबाईलवर मदतीची नोंद केल्यानंतर युनिक आयडी मिळेल, त्यामुळे त्याला नोंद झाल्याचे लक्षात येईल.

सर्व मतदारांबाबत विशेष करुन दिव्यांग मतदारांच्या (पीपल विथ डिसॲबिलिटी – पीडब्ल्यूडी) बाबतीत अधिक जागरुक राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा जिल्हा प्रशासन देणार आहे. मतदान प्रक्रीयेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नये तसेच त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होवू नये, यासाठी प्रशासन विशेष सोयी-सवलती उपलब्ध करुन देणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदार संघातील मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियांनातर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंचे सर्वेक्षण केले आहे. मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या विचारात घेऊन अशा मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करुन देणार आहे. अंध व अधुदृष्टी मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शक पुस्तिका, काचेचे भिंग, ब्रेल लिपीतील डम्मी मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल.

या विधानसभा निवडणूकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संकल्प पत्राचे वाटप करुन त्यांच्या पालकांकडून “मतदानाचा हक्क बजावणारच,” असे संकल्पपत्र जमा करण्यात आले आहे. जिल्हयामध्ये अशा 4 लाख 50 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी असे “संकल्प” पत्र दिले आहे.

निवडणूका हा राष्ट्रीय उत्सव आहे. या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवे. मतदान करणे हे आपले कर्तव्य असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

Exit mobile version