Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रोजगार भरती मेळाव्यात ८०३ उमेदवारांची निवड

पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून नोंदणी केलेल्या ८३७ पैकी ८०३ उमेदवारांची निवड करण्यात आली.

या मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण ४५ आस्थापना सहभागी झाल्या होत्या. शिकाऊ उमेदवारी भरतीकरीता आयटीआय उत्तीर्ण तसेच इतर शाखेतील एकूण ८३७ उमेदवारांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. आस्थापनांच्या मनुष्‍यबळ विकास विभागाकडून ८३७ पैकी ८०३ विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशिअन, टर्नर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मशिनिस्ट व संगणक या पदांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे १२१ महिला उमेदवार पैकी ९६ महिला उमेदवारांची प्रामुख्याने सुईंग टेक्नोलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, संगणक परिचालक या पदासाठी निवड करण्यात आली आहे.

औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. आर. शिंपले यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास टेके व यशवंत कांबळे, घोले रोड येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे डब्ल्यू. व्ही. कोठेकरकनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रतिक देशमुख व दीपक चौधरी आदी उपस्थित होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नुकताच निकाल जाहीर झाल्यानंतर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे राज्यभरातून मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्राचार्य यांनी यावेळी दिली.

Exit mobile version