Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा गतीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’

पुणे : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यामध्ये नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा गतीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ उपक्रमाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित  होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा विविध माध्यमातून १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा गतीने निपटारा करावा. प्रलंबित प्रकरणांपैकी कार्यवाही झालेल्या आणि न झालेल्या प्रकरणांविषयी सेवा पंधरवडा समाप्तीनंतर ५ ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यातील कामकाजाचा प्रगती अहवाल प्रमाणपत्रासह सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे,  प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या  लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा १४ सेवांचा यामध्ये समावेश करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले.

अधिकाधिक नागरिकांना सेवा देण्यासाठी हा ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाने शेवटच्या नागरिकांपर्यंत सेवा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, यासाठी विभागनिहाय नोडल अधिकारी नेमला जाणार असून याबाबतचा दैनदिन आढावाही घेतला जाणार आहे. सर्व विभागांच्या माध्यमातून शासनाच्या सर्व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे घेवून जाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विभागप्रमुखांनी आपल्या विभागाच्या सेवांबाबत माहिती दिली.

Exit mobile version