उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी सन्मानित
Ekach Dheya
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २०१८ सालच्या ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कारासाठी श्री कुलकर्णी यांची निवड झाली होती. त्यांची विभागामध्ये १९८९ साली सहायक अभियंता श्रेणी-१ या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. कार्यकारी अभियंता पदी लातूर, अकोला, पुणे व अहमदनगर येथे सेवा केली असून रत्नागिरी येथेही ते अधीक्षक अभियंता होते. त्यांनी २६ जुलै २००५ मधील मुंबई- कोकणातील जलप्रलयानंतर रायगड जिल्ह्यातील दासगाव, जुई कोंडवते गावाचे पुनर्वसन तात्काळ पूर्ण केले.
आपल्या सेवा काळात त्यांनी औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील उड्डाणपुलामध्ये मराठवाड्यात प्रथमच ‘रेनफोर्सड् अर्थ वर्क’ या नवीन तंत्रज्ञानाद्वारे पोचमार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले. त्यांनी इमारती, रस्त्यांच्या बांधकामात विविधता व वैशिष्ट्यपूर्णता जपली. औरंगाबाद येथील पहिली विभागीय ग्रंथालय इमारत, राजभवन मुंबई येथील कर्मचारी वसाहतीतील १५ मजली इमारत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला उभारणीत वैशिष्टपूर्ण वसतीगृह व इमारत बांधकाम, अकोला जिल्ह्यात जवळपास शंभर खेडी रस्त्याने जोडण्यात आली. पुणे येथील राजभवन इमारतीचे सुशोभिकरण, विधानमंडळ इमारतीचे नियोजन आदी विविध उल्लेखनीय कामे केली.
उत्तम प्रशासकीय अधिकारी आणि पारदर्शक कारभारासाठी जे. डी. कुलकर्णी सर्वांना परिचित आहेत. आशियाई विकास बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या रस्ते सुधारणा प्रकल्पामध्ये समन्वय अधिकारी म्हणून ते काम पाहत आहेत. यापूर्वी शासनाची धोरणे ठरवणाऱ्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा वैयक्तिक पुरस्कार जाहीर मिळाल्याबद्दल कुलकर्णी यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.