पुणे : वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.
उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजने व मापे यांची विहीत मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न करणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते.
पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तुवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधिकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास या विभागाकडुन कारवाई केली जाते.
येणाऱ्या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणुक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२ ०२०-२६१३७११४ व्हॉटस अप क्रमांक ९८६९६९१६६६ या क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे जिल्हा यांनी केले आहे.