Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत हा कथाकारांचा देश आहे, चित्रपट निर्मात्यांनी वैयक्तिक कथांवर आधारित चित्रपटांवर भर द्यावा- जॉन बेली

नवी दिल्ली : परदेशी चित्रपट संस्थांसोबत सहकार्य करुन भारतीय चित्रपटसृष्टीला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस्‌ ॲण्ड सायन्स संस्थेचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या सोबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. नवी दिल्लीतल्या सिरी फोर्ट येथे झालेल्या या चर्चासत्रानंतर बेली यांनी पत्रकार परिषद घेतली.

ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस्‌ ॲण्ड सायन्स या संस्थेत भारतीयांची सदस्य संख्या वाढायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले. या अकादमीमध्ये विविध देशातले प्रतिनिधी सहभागी व्हावेत यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले. भारत विपुल संधी, आव्हाने आणि विविधतेत असलेली एकता खऱ्या अर्थाने दर्शवणारा देश आहे असेही ते म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात देशभरातल्या विविध जनसंवाद शिक्षणसंस्थांच्या विद्यार्थ्यांना जॉन बेली यांच्याशी संवाद साधता आला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेल्या जॉन बेली यांच्या व्यावसायिक चित्रपट निर्मितीचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळाले. भारत हा कथाकारांचा देश आहे असे सांगत भारतीय चित्रपट निर्मात्यांनी व्यक्तीगत कथा प्रभावीपणे मांडणाऱ्या चित्रपट निर्मितीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला. अकादमीसोबत काम करण्यासाठी भारताने दर्शवलेल्या उत्साहाचे त्यांनी कौतुक केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. भारतात चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रचंड कला आणि गुणवत्ता दडलेली आहे असे सांगत प्रादेशिक भाषांमध्ये दर्जेदार चित्रपट निर्माण करण्यावर सध्या भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विविध राज्यातल्या चित्रपट निर्मात्यांना सरकारकडून मिळणारी मदत आणि प्रोत्साहनाचा त्यांनी उल्लेख केला. तसेच या कामात अकादमीची मदत मिळाल्यास भारतीय चित्रपट निर्मात्यांची कला जगभरात दाखवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन महामंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनीही यावेळी संवाद साधला. सिनेमा हा भारतातील नागरिकांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे असे सांगत या चित्रपटातूनच भारतीय जीवनाचे तत्वज्ञान मानले जाते असे ते म्हणाले. तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे चित्रपटसृष्टीचे लोकशाहीकरण झाले आहे असे मत त्यांनी व्यक्‍त केले. भारतीय चित्रपटात भावनाप्रधान कथानक आणि गाण्यांना व गीतांना असलेले महत्व हे त्याचे वैशिष्ट्य आहे असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version