Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल. रस्त्यांच्या मध्यभागी आणि बाजूला वृक्षारोपण केल्यामुळे प्रदुषणात घट होईल तसंच समृद्धी पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल, असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विट संदेशात  म्हटलं आहे. NH-754A या महामार्गाच्या  राजस्थान गुजराथ सीमाभागातून संतालपूरपर्यंत जाणाऱ्या सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचं काम वेगानं सुरु असल्याची माहिती गडकरी यांनी या ट्विट संदेशातून दिली आहे. गुजरातमध्ये दोन हजार तीस कोटी रुपये खर्चाच्या अमृतसर- जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरची उभारणी होत आहे. यामुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळेत दोन तासांची बचत होईल असंही त्यांनी नमूद केलं आहे. सध्या सुरु असलेल्या महामार्गांच्या कामांबद्द्ल ट्विटर संदेशमालिकेमधून माहिती देताना गडकरी यांनी उत्तम कनेक्टिविटी आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा यांच्याद्वारे देशाचा कायापालट करण्यासाठी केंद्रसरकार कटीबद्ध असल्याचं म्हटलं आहे.

Exit mobile version