प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होते. पुढल्या दोन वर्षांमध्ये देशाच्या मोठ्या भागात 5G सेवा घेऊन जाण्यात सरकारला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गावांपर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी ३० अब्ज डॉलर्स खर्च केले जातील असं ते म्हणाले. सध्याची 4G सेवा आणि भविष्यातल्या 5G सेवेला ही गावं जोडली गेल्यानं इथल्या तरुणांना आपल्या सृजनशील ऊर्जेचा उपयोग करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु होत असलेल्या डिजिटल प्रवासात सहभागी होता येईल असं ते म्हणाले. लोकसभेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांचं फिनटेक मध्ये भाषण झालं.
सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात, डिजिटायझेशन आणि डी-कार्बनायझेशन अर्थात कार्बन उत्सर्जन कमी करणे हे दोन घटक भारताच्या आर्थिक विकासाला चालना देत असल्याचं ते यावेळी म्हणाले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड फिनटेक मध्ये बोलताना म्हणाले की डिजिटल व्यवहार, आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सर्वसमावेशकता याचं प्रमाण भारतात सर्वाधिक असून, अर्थ विषयक सेवा देण्यासाठी नव-तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत ४५ कोटी ५० लाख नागरिकांची बँक खाती उघडण्यात आली असून त्यांना रूपे कार्ड देण्यात आली आहेत आणि यामध्ये फिनटेकची भूमिका सर्वात महत्वाची असल्याचं ते म्हणाले. खासगी फिनटेक कंपन्यांनी देखील देशाच्या नागरिकांमध्ये अर्थ-साक्षरता निर्माण करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.