फिलिपाईन्समध्ये नोरू, अमेरिकेत फ्लेरिडा इथं इयान, तर कॅनडाच्या अँटलांटिक किनाऱ्यावर फियोना वादळाचा तडाखा
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : फिलिपाईन्समध्ये धडकलेल्या नोरू या चक्रीवादळामुळे लूजोन या मुख्य बेटावर प्रतितास २४० किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. वादळानंतर झालेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यातल्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. या वादळाच्या तीव्रतेत प्रतितास ९० किलोमीटरची भर पडत आहे, ही अभूतपूर्व स्थिती आहे, असं हवामानशास्त्रज्ञांचं मत आहे. हे वादळ उद्या व्हिएतनामला पोचेल. त्यापूर्वी या वादळाची तीव्रता पुन्हा वाढेल असा अंदाज आहे.
अमेरिकेत फ्लेरिडामध्येही इयान या उष्णकटीबंधीय वादळाची तीव्रता वाढल्यामुळे नासाच्या आर्टेमिस वन या चंद्ररॉकेटचे प्रक्षेपण रद्द केलं आहे. आर्टेमिस वन उद्या फ्लोरिडाच्या केनडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित होणार होतं. या वादळामुळे फ्लोरिडा कीज आणि दक्षिण फ्लेरिडात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. कॅनडाच्या अॅटलांटिक किनाऱ्यावर फियोना-हे मोठं वादळ थडकल्यामुळे तिथं हाहाकार उडाला आहे. इमारती आणि घरे जमीनदोस्त झाली आहेत. तिथला वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. कॅनडात पोहोचण्यापूर्वी फियोना वादळाने कॅरेबियन क्षेत्रात कहर केला. नोवा स्कोटिया, न्यू ब्रंसविक, प्रिंस एडवर्ड बेटे और न्यूफाउंडलैंडमधे थडकल्यानंतर ते आता समुद्रात कमजोर झालं आहे.