मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत प्राप्तीकर विभागाने मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी धडक कृती दलाची क्षमता वाढवण्यात आली. प्राप्तीकर विभाग 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान बेहिशेबी रोख रक्कम / मौल्यवान वस्तुंच्या व्यवहारांवर विशेष लक्ष देईल.
प्राप्तीकर विभाग पोलीस, नागरीक आणि अन्य संस्थांकडून मिळत असलेल्या माहिती आणि दूरध्वनीला प्रतिसाद देत आहे. दररोज 132/132ए/133ए कलमांतर्गत शोध मोहिमा हाती घेतल्या जात आहेत.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध जिल्हे/ मतदारसंघांमध्ये नियंत्रण कक्ष आणि जलद प्रतिसाद दल स्थापन करण्यात आले. त्याचबरोबर प्राप्तीकर विभागाने 1800221510 हा टोल फ्री क्रमांक सुरु केला असून, बेहिशेबी रोख रक्कमेसंबंधी माहितीसाठी (9372727823/9372727824) हे समर्पित व्हॉट्स अप क्रमांक सुरु केले आहेत.
निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्राप्तीकर विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांमधून व्यापक जनजागृती कार्यक्रम तसेच विमानतळ, एफएम वाहिन्या आणि समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे.
महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तीकर विभागाच्या प्रधान संचालकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.