केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी
Ekach Dheya
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली. एनडीए चौकातील पुल पाडण्याच्या कामाच्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पुलाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम ८ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतून चांदणी चौक ते रावेत / किवळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पुल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाच्या आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना श्री.गडकरी यांनी दिले. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी श्री.गडकरी यांना चांदणी चौकातील पुल पाडण्याच्या कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.