Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे तसेच टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी https://admissions.tiss.edu या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल. तर, जानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित मानद विश्वविद्यालय संस्थेच्या ‘स्कुल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या विभागाद्वारे युजीसी निकषानुसार पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ‘कमवा व शिका’ या तत्वावर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेऊ शकेल. या संस्थेने अभ्यासक्रमाकरीता 3 हजार 750 उद्योगांसोबत करार केला असून विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा जॉबरोल निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतेही प्रवेश क्षमतेचे बंधन नाही. यामध्ये प्रामुख्याने अॅग्रीकल्चर, ऑटोमोटिव, चाइल्ड केअर, इलेक्टॉनिक्स, लाईफ सायन्स, रिटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अॅन्ड आंत्रेप्युनरशिप, टुरिजम अॅन्ड हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान, मीडिया व एंटरटेनमेंट, बँकींग व वित्तीय क्षेत्र यामधील संधींचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, कामाला प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी व्यवसाय शिक्षण आवश्यक असून याद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थी हा जागतिक स्तरावर आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचा भाग बनू शकतो. केंद्र पुरस्कृत व्यवसाय शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर या योजनेअंतर्गत राज्यामध्ये एकूण 646 शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 12 व्यवसाय शिक्षण विषय शिकविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये 70 हजार विद्यार्थी व्यवसाय शिक्षण घेत आहेत.

समग्र शिक्षा कार्यालयाने जागतिक बँक पुरस्कृत ‘स्टार्स’ (STARS) प्रकल्पांतर्गत ‘मिलाप’ (Maharashtra Young Leaders Aspirations Development Programme) हा कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याआधी एचसीएल या नामांकित माहिती तंत्रज्ञान कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून त्याअंतर्गत इयत्ता बारावी गणित या विषयासह उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ‘कमवा आणि शिका’ तत्वावर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या संधीचा समावेश आहे. या नोंदणीसाठी https://registrations.hcltechbee.com/ हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. आतापर्यंत 34 हजार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. तर या दोन्ही करारांच्या माध्यमातून सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

या सामंजस्य कराराद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तरी, जास्तीत जास्त गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.

Exit mobile version