Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पीएमपी बसथांब्यांवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करावी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे प्रवासी पळविणाऱ्या आणि अनधिकृतपणे बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या नियोजनाने वेग घेतला आहे. यासाठी पोलीस बळ पुरविण्याची मागणी करणारे पत्र प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडे दिले आहे.

शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीने प्रवासी पळविणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे शस्त्र हाती घेतले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पीएमपीच्या सुमारे 1,200 बसेस धावतात. दोन्ही शहरातील पीएमपीच्या अनेक बसथांब्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी केली जातात.

त्यामुळे वाहतूक कोंडीसह पीएमपीच्या प्रवासी सेवेवर परिणाम होत आहे. याचा आर्थिक फटका बसत आहे. अवैध वाहनांमुळे पीएमपी बस अडकून पडतात. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला बसेसना जबाबदार धरले जाते. या पार्श्‍वभूमीवर अवैध वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पीएमपीबरोबर वाहतूक शाखेने सहकार्य केल्यास वाहतूक पोलीस आणि पीएमपीएमएलच्या पथकाने कारवाई करणे शक्‍य होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पिंपरीप्रमाणे कारवाई व्हावी
पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये पीएमपी बसथांब्यांवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने वाहतूक पोलीस उपलब्ध करुन दिले होते. त्याचप्रमाणे शहरातील कारवाई करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करित आहे. त्यामुळे पीएमपीला दोन वाहतूक पोलीस उपलब्ध करुन द्यावेत, अशा मागणीचे पत्र पीएमपी प्रशासनाने वाहतूक पोलीस विभागाला पाठविले आहे.

Exit mobile version