Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नाशिकजवळ भीषण बस अपघातात १२ जणांचा मृत्यू, ३१ जण जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमध्ये पहाटे झालेल्या बस आणि ट्रक अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत.  मृतांमधल्या ४ जणांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं. खासगी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. ट्रकशी धडक झाल्यानंतर बसनं पेट घेतला. या बसमधले चार जण  घरी सुखरुप पोहचले असून ३१ जणांवर नाशिकमधल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसंच या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसंच रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे.  दरम्यान या  भीषण अपघातात वाशीम जिल्ह्यातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी २ जण बेपत्ता असल्याचं वृत्त आमच्या वार्ताहरानं दिलं आहे. या बसमध्ये वाशिम जिल्ह्यातले १२ प्रवासी होते. यातले काहीजण चालकाच्या केबिनमधून प्रवास करत होते, अशी माहिती प्रवाशांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Exit mobile version