शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर घाईघाईत निर्णय न घेण्याची ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात जोपर्यंत सर्व कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करु नये. कागदपत्र जमा करण्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे गट उमेदवार देणार नाही. केवळ भाजपाला फायदा व्हावा म्हणून शिंदे गटानं आयोगाला पत्र पाठवून त्वरित सुनावणीची मागणी केल्याचा दावाही ठाकरे गटानं केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटानं काल आणि आज निवडणूक आयोगाकडे त्यांची बाजू मांडली. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दिली असून आणखी अडीच लाखांहून अधिक पक्ष सदस्यांची प्रतिज्ञापत्र जमा करु असं ठाकरे गटाचे वकिल अॅडव्होकेट सनी जैन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. यासोबतच १० ते १५ लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्जही जमा केले जातील. त्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी मागितल्याचं जैन यांनी सांगितलं.