महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
Ekach Dheya
मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ
मंत्री श्री. लोढा म्हणाले, महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ या मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या मेळाव्यात शंभर महिला बचतगट सहभागी होणार आहेत. स्वयंसहाय्यता बचतगटांच्या कार्यक्षेत्रीय स्तरावरील अडचणी जाणून घेणे, त्यांना बचतगट मेळाव्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बचतगटांना ऑनलाईन साहित्य विक्री करता यावी, याकरिता जागतिक बाजारपेठेतील कंपन्याचा सहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायं. ६ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड, सदा सरवणकर यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. यशस्वी उद्योजकांचा सन्मान, बचतगटातील महिलांना उद्योजक व्यवसायिक साहित्य वाटप, प्रातिनिधिक बचतगटांना (बँक कर्ज) धनादेश वाटप, यशस्वी उद्योजक महिलांचे अनुभव कथन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बचतगटांचे स्टॉल व मान्यवरांचे मार्गदर्शन
दि.१२ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायं. ६ या कालावधीत महिलांकरिता विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती, कौशल्य विकास, बँकांकडील पतपुरवठा सेवा व बाजारपेठ, विविध शासकीय महामंडळे यांच्या महिला बचत गटांसाठी असलेल्या कर्ज योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. महिला बचतगट उत्पादित विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याच्या विक्रीकरिता स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत. माविम ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. तरी बचतगटांच्या स्टॉलला जरूर भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.