पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सप्टेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजनेकरीता प्रती शिधापत्रिका १५ किलो गहू, २० किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू, ३ किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी १ किलो गहू व ४ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रती लाभार्थी दोन्ही योजनेचे मिळून १० किलो धान्य लाभार्थ्यास मिळते.
या योजनांचे सप्टेंबरचे धान्य घेतले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर २०२२ च्या धान्यासोबत सप्टेंबरचे धान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांनी धान्य प्राप्त करुन घ्यावे व दोन्ही योजनांचे धान्य घेतल्याबद्दल स्वतंत्र पावती स्वस्त धान्य दुकानदारांकडून घ्यावी.
लाभार्थ्यांना योजनानिहाय मिळणाऱ्या धान्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकल्यास मिळणार आहे, असेही श्रीमती माने यांनी कळवले आहे.