पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन नामंजूर केला.
पुण्यात कोरेगाव भीमा इथं जातीवर आधारित हिंसाचाराला कथित चिथावणी देण्यावरून तसंच नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून या तिघांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या तिघा आरोपींना स्थानबद्ध ठेवलं होतं. त्यानंतर पुण्याच्या सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यावर 26 ऑक्टोबरला त्यांना कोठडीत ठेवण्यात आलं. या तीन आरोपींसह आणखी काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी यूएपीए अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी त्या तिघांना जामीन नाकारला. दरम्यान याप्रकरणी नागरी अधिकार कार्यकर्ता गौतम नवलखा यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण सर्वोच्च न्यायालयानं 4 आठवड्यांनी वाढवलं आहे. मात्र त्यांनी रीतसर अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करावा, असं न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी स्पष्ट केलं.