महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ekach Dheya
मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्योगवाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी नवे सरकार पूर्ण प्रयत्न करत असून राज्याला उद्योगात क्रमांक 1 चे राज्य बनवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, उद्योग राज्यात येण्यासाठी कसे वातावरण हवे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. एअरबससंदर्भात आपण कंपनीशी संपर्क केला. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाठपुरावा केला.
प्रत्येक प्रकल्पनिहाय तारखा आणि त्या-त्यावेळी प्रकाशित विविध वृत्तही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुराव्यानिशी सादर केले. फॉक्सकॉनसंदर्भात ते म्हणाले की, 7 जानेवारी 2020 रोजीच तत्कालीन उद्योगमंत्री यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही, हे स्पष्ट केले होते. डिसेंबर 2021 मध्येच एअरबससाठी गुजरातची जागा निश्चित झाली होती. मार्च 2022 मध्ये टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लि.ने (टीएसीएल) गुजरात अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (जीएएआर) यांच्याकडे एक पत्र दिले आणि त्यात गुजरातमधील 4 जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगितले, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सॅफ्रनच्या बाबतीत तर ‘फेक नॅरेटिव्ह’चा कहरच झाला. फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी सॅफ्रनच्या हैदराबाद फॅक्टरीतील त्यांचे छायाचित्र 2 मार्च 2021 रोजी ट्विट केले आहे. 7 जुलै 2022 रोजी हा प्रकल्प सुरू झाल्याचे छायाचित्रासह वृत्त अनेक ठिकाणी प्रकाशित झाले आहे. काल-परवा हा प्रकल्प गेल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.