मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचं वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. काल मुंबईत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. कलावंतांना मोठं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं आहे, आशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी त्या नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याबाबत यापूर्वी बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. खराब स्थितीतील नाट्यगृहांच्या पाहणीसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल आणि त्या नाट्यगृहांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असंही ते म्हणाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.