Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा

मुंबई : राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा  करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री सिंह म्हणाले, “राज्यामध्ये दि. 8 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3428 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 216642 बाधित पशुधनापैकी एकूण 148262 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 14259 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 136.96 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 97.88 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

श्री.सिंह यांनी आवाहन केले आहे की,  महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि.17.10.2022 रोजी दिलेल्या सुधारित उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.

दि.28.10.2022 रोजीच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत  दूरदृष्यप्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लंपी चर्मरोगाने बाधित नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण  न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारित केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही श्री.सिंह यांनी केले आहे.

Exit mobile version