देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी संपन्न
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १३ मे २०१६ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. पुढची दोन वर्ष ते सरन्यायाधीश पदावर राहतील. सामान्य नागरीकांची सेवा करणं हे आपलं प्राधान्य असून, न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी काम करणार असल्याचं, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, शपथविधी समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांचे अभिनंदन केलं आहे. “न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांना आगामी फलदायी कार्यकाळासाठी शुभेच्छा.” असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या आजपर्यंतच्या न्याय क्षेत्राच्या गौरवास्पद वाटचालीत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या कारकिर्दीनं आणखी भरच पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.