दुर्लक्षित क्षेत्रांसाठी राज्यात तत्काळ धोरण निश्चिती मोहीम राबवण्यात येणार – उद्योग मंत्री उदय सामंत
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून ज्या क्षेत्रांवर आतापर्यंत विकासाच्या दृष्टिनं धोरणे आखली गेली नाहीत अशा क्षेत्रासाठी तत्काळ धोरण निश्चित करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते काल फुटवेअर अँड लेदर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंग क्षेत्रासाठी क्लस्टर उभारण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. सामंत म्हणाले की, उपरोक्त क्षेत्रात राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेयर आणि लेदरसंदर्भात येत्या ३० दिवसांमध्ये धोरण निश्चित केले जाईल. सामंत म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करीत असून, अधिकाधिक उद्योग राज्यात यावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन धोरणांची निर्मिती करून, सध्या असलेल्या धोरणांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे ही त्यांनी सांगितलं.