नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीनं राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स असोसिएशन, पेन्शन वितरण बँका, केंद्रीय मंत्रालय/विभाग आणि केंद्र शासन आरोग्य सेवा- सीजीएचस वेलनेस सेंटर यांसाठी विशेष शिबिरं आयोजित करून जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट-फेस ऑथेंटिकेशन’ तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याच अनुषंगानं केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या नागपूर शाखेनं शिबिराचं आयोजन केलं आहे. याप्रसंगी पेन्शन विभागाचे वरिष्ठ सल्लागार हरजित सिंग आणि पेन्शन विभागाचे उपसचिव रमेशचंद्र सेठी हे उपस्थित होते.
ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण अधिका-यांमार्फत देखील उपलब्ध आहे. केंद्र शासनानं सर्व निवृत्तीवेतनधारकांना त्यांचं जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीनं सादर करण्यासाठी संबंधित केंद्राला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.