हिमाचलच्या वस्तूंचं उत्पादन आणि त्यांची ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीनं विक्री करण्याबाबत विचार करावा -अनुराग ठाकूर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोजगाराच्या दिशा आ़णि क्षमता यांचा विचार करणं गरजेचं असून. हिमाचलच्या वस्तूंचे उत्पादन आणि त्याची विक्री ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीने करण्याबाबत विचार करावा असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल हिमाचल मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७१ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई इथं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. मागील पाच वर्षांत हिमाचल प्रदेशात ११ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे आता हिमाचल प्रदेशातील युवकांना वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईत येण्याची गरज राहिली नाही. उलट मुंबईतून विद्यार्थी हिमाचल प्रदेशातील महाविद्यालयात येतील अशी अपेक्षा अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. हिमाचल प्रदेशातील कला आणि संस्कृतीची ओळख जगभरात व्हावी यासाठी हिमाचलमधील तरूणांमध्ये स्पर्धा घेणार असल्याची घोषणा करतच मुंबईत राहून आपल्या हिमाचली संस्कृतीत कशी वाढ होईल याकडे हिमाचल मित्र मंडळाने लक्ष द्यावे असं आवाहनही अनुराग ठाकूर यांनी यावेळी केलं. हिमाचल प्रदेशातील रहिवाशांमध्ये खूपच क्षमता आहे.या भागाचा विकास गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या अनेक यशस्वी प्रकल्पांमुळे गतीने झाला. आज जे प्रकल्प देशात आहेत ते सर्व प्रकल्प हिमाचल प्रदेशातही आहेत. असाच विकास करण्यासाठी हिमाचल प्रदेशात आता अधिक रोजगार निर्मितीही होणे आवश्यक आहे. असं ते म्हणाले. या कार्यक्रमात हिमाचल प्रदेशसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा अनुराग ठाकूर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांनी गेल्या पाच वर्षांतील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.