भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५ दिवस चालणाऱ्या या सरावात उंचीवर आणि अत्यंत थंड हवामानातील युद्धावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अमेरिकी लष्कराच्या ११व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या दुसऱ्या ब्रिगेडचे सैनिक आणि आसाम रेजिमेंटचे भारतीय सैन्य सैनिक या सरावात सहभागी होणार आहेत.
शांतता स्थापन करण्यातील लष्कराच्या कार्यवाहीचाही यात समावेश असून, आपत्ती निवारण आणि बचाव कार्यावरही यात भर दिला जाणार आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सर्वोत्तम सराव, रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशानं हा युद्ध अभ्यास दरवर्षी आयोजित केला जातो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अलास्का इथं हा युध्द सराव झाला होता.