Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून पालकमंत्री पाटील म्हणाले, आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या. महसूल मंत्री असतांना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी ४०० एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला. या जागेच्या विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास पुणे महानगर विकास प्राधिकरणाची मान्यता घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल.

आराखड्यातील कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल) वारीसाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल. व्हर्चुअल वारीमुळे पंढरपूरला जाऊ न शकलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. संस्थानने त्याचे डिझाईन त्वरीत तयार करावे. नगर परिषदेच्या माध्यमातून ही कामे करण्यात येतील. पुढील टप्प्यात रुग्णालय व इतर कामांचादेखील समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीत येतात. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जगणाऱ्या वारकऱ्यांची भेट होईल म्हणून आपण आळंदीत आल्याचे त्यांनी सांगितले. जनतेची सेवा करण्यासोबत अशा देवस्थान परिसराचे प्रश्न सोडविण्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version