Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उच्चाधिकारी समितीची मुंबईत बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत सूचना केली होती. यासंदर्भातल्या कायदेशीर लढाईसाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली असून, समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातल्या बांधवांना प्रभावीपणे मिळावा, यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचं बळकटीकरण करावं, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्यास, तसंच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातल्या नागरिकांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सनदशीर मार्गाने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आम्ही सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. दरम्यान, आपण मांडलेल्या सूचनांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत मान्यता दिल्याचं विरोधी पक्षनेते दानवे यांनी, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सीमा भागातल्या ८६५ गावांना बंद झालेले मुख्यमंत्री धर्मदाय योजनेतून मिळणारे लाभ पुन्हा सुरू करावेत, यासह अनेक विनंतीवजा सूचना आपण केल्या, मुख्यमंत्र्यांनी त्या तत्काळ मान्य केल्याचं ते म्हणाले.

Exit mobile version