Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते ‘परमार्थ रत्न 2019’ पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान

मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

परमार्थ सेवा समितीद्वारे दिला जाणारा ‘परमार्थ रत्न 2019’  पुरस्कार श्रीमती अमला रुईया यांना राज्यपालांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीद्वारे हॉटेल सहारा स्टार येथे दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रामप्रकाश बुबना उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, भारतीय संस्कृती तिच्या मूल्यांमुळे जगात सर्वश्रेष्ठ ठरते. 100 हातांनी जमा केले असेल, तर हजार हातांनी त्याचे दान करावे असे आपली संस्कृती सांगते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण हाच मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. श्वसनासाठी आपण जो प्राणवायू वापरतो, त्याच्या कितीतरी पट अधिक प्राणवायू निर्माण होण्यासाठी झाडे लावली पाहिजेत.

राज्यपाल म्हणाले, जलसंधारणाच्या क्षेत्रात श्रीमती रुईया यांचे कार्य मोठे आहे. इतरांसाठी केलेले छोटे कामही मोठे असते. म्हणून आपण सर्वांनी श्रीमती रुईया यांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे. त्यांचे कार्य समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन श्री.कोश्यारी यांनी उपस्थितांना केले.

सत्काराला उत्तर देताना अमला रुईया म्हणाल्या, या पुरस्कारामुळे जलसंधारणाच्या क्षेत्रात आणखी जोमाने काम करण्यासाठी मला नवी ऊर्जा मिळाली आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद आहे असे मी समजते.

प्रास्ताविक परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियानी यांनी केले. आभार सचिव रवि लालपुरीया यांनी मानले. यावेळी मंचावर समितीचे प्रेसिडेंट गोपाल बियानी, विश्वस्त रामविलास हुरकट, मनमोहन गोयंका आदी उपस्थित होते.

Exit mobile version