भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असा राज्यपालांना विश्वास
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि रशियातल्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं काल मुंबईत रशियन सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवाला कोश्यारी यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. दोन्ही देशांमधले सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. भारतातल्या रामचरित मानस तसंच ज्ञानेश्वरी प्रमाणेच रशियातल्या मॅक्सिम गॉर्की, लिओ टॉल्स्टॉय, अँटन चेकॉव्ह यांचं साहित्यही सार्वकालीक श्रेष्ठ आहे असं ते म्हणाले. रशियाचे मुंबईतले वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव तसंच वाणिज्यदूत जॉर्जी ड्रीअर यांच्यासह अनेक मान्यवर आणि अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या महोत्सवानिमित्त दिल्ली आणि कोलकाता इथंही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याचं रशियाच्या वाणिज्यदूतांनी सांगितलं.