नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी 2022 सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार टेबल टेनिसपटू शरत् कमल अचंता यांना प्रदान करण्यात आला. अश्विनी अकुंजी आणि धरमवीर सिंग यांच्यासह एकूण चार खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातल्या आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानं राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. अर्जुन पुरस्कार यंदा २५ खेळाडूंना देण्यात आला. क्रीडा क्षेत्राचा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणीमध्ये जीवनज्योत सिंग तेजा आणि मोहम्मद अली कमर यांच्यासह पाच क्रीडा प्रशिक्षकांना, तर जीवन गौरव श्रेणीमध्ये तीन प्रशिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारा महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाचा मौलाना अबुल कलाम आझाद करंडक अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठाला प्रदान करण्यात आला.